सलग चौथ्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. वेस्ट इंडिजमधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी होणाऱ्या महाअंतिम लढतीत हेच लक्ष्य साध्य करण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. परंतु यासाठी त्यांना इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या इंग्लंडचा अडथळा ओलांडावा लागेल.
यश धूलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही. करोनाने शिरकाव केल्यानंतरही भारताची कामगिरी ढासळली नाही. साखळीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी दिल्यानंतर सहा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताने आर्यलड, युगांडाचा सहज धुव्वा उडवला. मग उपांत्य लढतीत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यामुळे भारताचेच पारडे अंतिम सामन्यासाठी जड मानले जात आहे.
दुसरीकडे टॉम प्रेस्टच्या इंग्लंडने अफगाणिस्तानवर रोमहर्षक लढतीत सरशी साधून तब्बल २४ वर्षांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताप्रमाणेच इंग्लंडही या स्पर्धेत अपराजित आहे. त्यामुळे उभय संघांपैकी कोणाच्या गळय़ात विजयाची माळ पडणार, याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.
भारत
’ बलस्थाने : मुंबईकर अंक्रिश रघुवंशीने भारतासाठी स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक २७८ धावा केल्या आहेत. त्याला कर्णधार धूल आणि उपकर्णधार रशीद यांची सातत्याने उत्तम साथ लाभली आहे. त्याशिवाय राज बावा, राजवर्धन हंगर्गेकर यांसारखे फटकेबाजी करण्यात पटाईत असलेले खेळाडू भारताच्या ताफ्यात आहेत. महाराष्ट्राचा फिरकीपटू विकी ओस्तवालने सर्वाधिक १२ बळी मिळवले असून वेगवान गोलंदाज रवी कुमार नवा चेंडू स्विंग करण्यात वाकबगार आहे.
’ कच्चे दुवे : सलामीवीर हर्नुर सिंगने गेल्या तीन सामन्यांत अनुक्रमे १५, ०, १६ अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून अंतिम फेरीत चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. याव्यतिरिक्त भारताला धावांच्या गतीवरही लक्ष ठेवावे लागेल. भारताच्या मधल्या फळीतील कामगिरीत सातत्याचा अभाव संपूर्ण स्पर्धेदरम्यान आढळून आला आहे. ही बाब त्यांना धोकादायी ठरू शकते.
इंग्लंड
’ बलस्थाने : इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्ट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत २९२ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. उपांत्य लढतीत अपयशी ठरल्यामुळे तो भारताविरुद्ध खेळ उंचावण्यासाठी आतुर असेल. याव्यतिरिक्त, आठव्या क्रमांकापर्यंत लांबलेली फलंदाजी इंग्लंडची ताकद आहे. वेगवान गोलंदाज जोशुआ बॉयडेन (१३ बळी) आणि फिरकीपटू रेहान अहमद (१२ बळी) यांपासून भारताला सावध राहावे लागेल.
’ कच्चे दुवे : अनेक वर्षांनी अंतिम फेरी गाठल्यामुळे भारतापेक्षा इंग्लंडच्या खेळाडूंवर अतिरिक्त दडपण असेल. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांची एकवेळ ५ बाद १०६ अशी अवस्था होती. त्यामुळे आघाडीच्या फळीकडून त्यांना सुधारणेची अपेक्षा आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची घसरगुंडी झाल्याचे या स्पर्धेत दिसून आले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकेल.
संघ
’ भारत : यश धूल (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, हर्नुर सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, कौशल तांबे, दिनेश बाणा, राज बावा, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर, रवी कुमार, आराध्य यादव, सिद्धार्थ यादव, मानव प्रकाश, अनीश्वर गौतम, गर्व सांगवान.
’ इंग्लंड : टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जॉर्ज थॉमस, जेकब बिथेल, जेम्स ऱ्यू, विल्यम लक्स्टन, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस स्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन, नॅथन बर्नवेल, जेम्स कोल्स, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ.
कोहलीकडून खास कानमंत्र
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय युवकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. कौशल तांबे आणि राजवर्धन हंगर्गेकर यांनी ‘इन्स्टाग्राम’वर कोहली मार्गदर्शन देतानाचे छायाचित्र पोस्ट करतानाच त्याचे आभारही मानले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००८मध्ये युवा विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आता त्याचे मार्गदर्शन संघातील खेळाडूंना कितपत लाभदायी ठरते, हे पाहणे रंजक ठरेल.