दिवा-मुंब्र्यात अनधिकृत नळजोडण्या पुन्हा खंडित

अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन जणांवर गुन्हे

ठाणे: दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या दुसऱ्या दिवशी २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी २९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच अनधिकृत नळ जोडणीबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय टीम तयार केल्या आहेत. त्यांनी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागातील 14 अनधिकृत व्यावसायिक (दुकाने, टपऱ्या) नळ जोडण्या खंडित केल्या. तर 10 घरगुती अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. वाय जंक्शन ते मुंब्रा-ग्लोबल नाला आणि आगासन गाव येथे 13 निवासी अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. आगासन गाव येथे सहा नळजोडण्या तर चार टँकर पॉईट उद्ध्वस्त करुन सहा पंप जप्त करण्यात आले. त्याचबरोबर, तीन अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत पाच पंप जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई करण्यात येत आहे.