अनधिकृत इमारतींमुळे चौथ्या मजल्याच्या उत्पन्नाला भगदाड

शहर विकास विभागाला सात दिवसांत २२० कोटींचे लक्ष्य

ठाणे: मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला अधिकृत इमारतींच्या माध्यमातून शेकडो कोटींचे उत्पन्न मिळत असते, मात्र ठाणे शहरात अनधिकृत इमारतींची बांधकामे फोफावल्याने या विभागाचे उत्पन्न समाधानकारक दिसत नाही. आता महापालिकेने या विभागाला दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी फक्त सात दिवस उरले आहेत.

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने यंदाच्या चालू आर्थिक वर्षात ५२९ कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात शहर विकास विभागाला ७५० कोटीचे लक्ष्य देण्यात आले होते. परिणामी उरलेल्या सात दिवसात या विभागाला २२० कोटी ६५ लाख रुपये उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्याचे कठीण आव्हान शहर विकास विभागापुढे आहे.

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला उत्पन्न हे विकास शुल्क, अतिरिक्त भूनिर्देशांक, वाढीव भूनिर्देशांक, छाननी शुल्क,आदीच्या माध्यमातून प्राप्त होते. महत्वाची बाब म्हणजे मागील काही वर्षात शासनाकडून विविध प्रकारे सूट देण्यात आली आहे. त्याचा परिणामही शहर विकास विभागाच्या उत्पन्नावर झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेकडे सध्या मर्यादित उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यात मुख्य मदार ही मालमत्ता कर आणि शहर विकास विभागाच्या उत्पन्नावरच आहे. त्यातही अनेक मालमत्ताकर धारकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. ठाणे महापालिकेला चालू अर्थसंकल्पात विविध माध्यमातून एकूण ३२८१ कोटी ९३ लाखांचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग हद्दीत सद्यस्थितीत २५० हून अधिक अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे शहर विकास विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नाला या प्रभागातील अनधिकृत बांधकामांमुळे मोठे भगदाड पडले आहे. जागर फाऊंडेशन संस्थेने याबाबत आयुक्त आणि संबंधित सहायक आयुक्त यांना पत्र दिले असून या नुकसानीबाबत जागरूक केले आहे. मात्र तरीही प्रशासन अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.