अनुत्तरित प्रश्न | राज्यसभा निवडणूक | मिलिंद बल्लाळ

महाराष्ट्रातील राज्यसभेचे सहा उमेदवार जाहीर झाले असून अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचे काँग्रेसमधून भाजपात येणे हे विशिष्ट हेतूने प्रेरित होते हे सुस्पष्ट झाले. चार वर्षे शिल्लक असूनही प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागण्यामागे काय विचार होता हे त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवारच सांगू शकतील. सौ. मेधा कुलकर्णी आणि मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांना त्यांच्या-त्यांच्या पक्षाने न्याय देण्याच्या हेतूने उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत सुरु असलेल्या घडामोडीतून थोडा दिलासा दिला आहे. नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना संधी देऊन भाजपाने एक प्रकारे निष्ठावान कार्यकर्त्यांची बूज राखली जाते हे दाखवून दिले आहे. या सर्व निवडीमागे राज्यसभेतील सदस्यांच्या निवडीमागील निकष आणि हेतू मात्र हरवून गेल्याचे दिसते. ज्येष्ठांचे सभागृह असा लौकिक असणाऱ्या संसदेच्या या सभागृहात विशिष्ट विषयांचे तज्ज्ञ आपापल्या क्षेत्रातील कामगिरीचा अनुभव आणि ज्ञान सरकारची धोरणे आखण्यासाठी वापरतील हा मूळ हेतू राजकीय समझौत्यांत मागे पडलेला दिसतो. पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित या निवडीमुळे राज्यसभेचा कोणता फायदा होणार आहे. हे कळायला मार्ग नाही.