उद्धव ठाकरे १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पहात होते

देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मुंबई: उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती आहे असं जे म्हटलं जातं आहे त्यात काही तथ्य नाही. सहानुभूती काम करणाऱ्यांबाबत असते. आजवर उद्धव ठाकरेंनी काय काम केलं आहे? काँग्रेसचा इतिहास तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि शरद पवारांनी स्वतःच सांगितलं आहे की त्यांनी पाच चिन्हांवर निवडणुका लढवल्या आहेत. वसंतदादांविरोधात जाऊन त्यांनी पुलोदचा प्रयोग केला. त्यावेळी त्यांनी आमच्या जनसंघाची मदत घेतली आज तेच शरद पवार अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. आत्ताही बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे निकाल लागणार नाहीत हे लक्षात आलं आहे त्यामुळेच छोट्या पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा त्यांनी सुरु केली.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. त्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, “आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर जातील असं कधीच वाटलं नव्हतं. बाळासाहेबांचे चिरंजीव असं कसं काय वागू शकतात? पण आम्ही विश्वास ठेवला, आमची चूक झाली.” असं देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. तसंच अडीच वर्षांचा शब्द आम्ही कधीही शिवसेनेला दिला नव्हता. पण त्याही पुढे जाऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. ते शिवसेनेचे होते आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता.

बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांना संधी द्यायला आपण तयार आहोत असं मला वाटलं. मी हा विषय मांडताच मोदींनीही होकार दिला आणि ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे त्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत,असंही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते आम्ही ओळखू शकलो नव्हतो. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत, काही गोष्टी लक्षात आल्या तरीही आम्ही बाळासाहेबांच्या आदरापोटी त्यांनाही आदरच देत होतो. खरंतर उद्धव ठाकरेंना युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव पुढे येत नव्हतं त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले असते पण तसं होऊ नये म्हणून रोखण्याची सगळी सोय त्यांनी पाहिली. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणं हे काही चुकीचं नाही. उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्त्वाचं वाटत असावं असं मला वाटतं. एक साधं उदाहरण देऊन सांगतो, मी मुख्यमंत्री असताना कोस्टल रोड हा एमएमआरडीए किंवा सिडकोच्या माध्यमातून बांधला जावा त्यामुळे काम वेगाने होईल असं त्यांना म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी नकार दिला आणि महापालिका ते करेल असं सांगितलं आता हे त्यांनी का सांगितलं हे जनतेलाही ठाऊक आहे.

राज ठाकरे हे राजकारण्यांच्या वर्तमान पिढीतले नरेटिव्ह देऊ शकणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते परत स्थिरावले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचं स्वागतच आहे. लोकसभेत त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही कारण आम्ही तीन पक्ष होतो आणि जागा ४८, विधानसभेच्या वेळी पाहू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.