अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू

शहापूर : एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावर खातिवलीजवळील फूड मॅक्स हॉटेलसमोर घडली.

येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील वासिंद-शहापूरकडील खातिवली गाव हद्दीतील असलेल्या शुभवास्तू या गृह संकूलात राहणाऱ्या सुरेखा मोरे (५८) आणि गुलाब खोपकर (६२) या आज सकाळी सहाच्या सुमारास रस्ता ओलांडताना नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनांची जोरदार धडक बसून या झालेल्या अपघातात त्या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत हॉटेलमधील असलेला सुरक्षा रक्षक रामभरोसे यादव यांनी दिलेल्या माहिती व तक्रारीनुसार वासिंद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व चालकाविरुध्द अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरिक्षक के.डी. वरठा करीत आहेत.

दरम्यान या क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून या ठिकाणी मंजूर झालेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी स्थानिक नागरिक व ये-जा करणारे प्रवासी आणि वाहनचालक यांच्याकडून करण्यात येत आहे.