कल्याण : कल्याण पश्चिमेत आरटीओनजीक टावरी पाड्यालगत घरगुती गॅस गळतीमुळे एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील स्वयंपाक घरात आगीचे लोळ उठून त्या आगीत दोन महिला गंभीर भाजल्याची घटना मगंळवारी संध्याकाळी घडली.
टावरी पाड्यालगत सर्वोदय हाईट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एक घरात स्वयंपाक घरात गॅस गळती झाली. त्यामुळे उडालेल्या आगीच्या भडक्यात दोन महिला भाजल्या. ही घटना संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास घडली. सुखविंदर कौर आणि कलवंत कौर अशी जखमी महिलांची नावे असून त्या दोघी सासू-सूना आहेत.
घरातील शयनगृहात महिला आणि तिचे दीड महिन्याचे बाळही होते, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून गॅस गळती थांबवण्यात आली. तर अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहचत आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आगीत स्वयंपाकघरातील साहित्य जळून खाक झाले तर जखमी महिलांना तातडीने उपचारार्थ रूग्णालयात नेले असल्याची माहिती अग्निशमन आधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.