एकाच गृहसंकुलात दोन प्रभाग; प्रकरण गेले न्यायालयात!

एकाच गृहनिर्माण संकुलाचे दोन तुकडे करून दोन वेगळ्या प्रभागात विभागणी करण्याचा विचित्र प्रकार ठाणे महापालिका क्षेत्रात झाला आहे.

तीन हात नाका येथे असलेल्या मित्तल पार्क गृहसंकुलात तीन इमारतींमध्ये साधारणत: साडेपाचशे मतदार राहतात. गेल्या निवडणुकीपर्यंत हे सर्व मतदार ठाणे महापालिकेच्या प्रभाग 19 मध्ये समाविष्ट होते. यावेळी मात्र दोन इमारती प्रभाग 22 तर एक इमारत प्रभाग 27 मध्ये सामावली गेली आहे. याबाबत काही जागरूक रहिवाशांनी ठाणे महापालिकेकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. या सोसायटीत एकाच आवारात या इमारती आहेत आणि ज्यांचे नागरी प्रश्न आहेत त्यांना असे विभागले का गेले असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. दोन भिन्न प्रभागात मतदान करावे लागणार असून नगरसेवकही वेगळे असणार आहेत, यामुळे नागरिकांनी नेमके कोणाकडे प्रश्न विचारायचे असा सवाल विचारण्यात आला होता. महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अखेर सोसायटीला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. आता हे प्रकरण न्यायालयासमोर येईल तेव्हा मतदारांना न्याय मिळेल अशी रहिवाशांना आशा आहे. जागरुक नागरिक विश्वास अवचट यांनी न्यायालयात दाद मागितली.