दिवा-मुंब्रा भागात ५७ अनधिकृत नळ जोडण्या, पाच टाक्या तोडल्या
ठाणे: दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या तिसऱ्या दिवशी ५७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी २९ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ४४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्याचबरोबर, अनधिकृत आरओ प्रकल्प, पाणी साठे, अनधिकृत टँकर भरणा केंद्र यावरही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अनधिकृत नळ जोडणीबाबत आणखी दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय टीम तयार केल्या आहेत. त्यांनी कारवाईच्या तिसऱ्या दिवशी आगासन फाटा, कल्याण फाटा ते वाय जंक्शन, रामनगर-बेतवडे पाणी टाकी या परिसरात कारवाई केली. त्यात, कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागात चार अनधिकृत व्यावसायिक नळ जोडण्या आणि १५ अनधिकृत निवासी नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. वाय जंक्शन ते मुंब्रा या भागात ३४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या गेल्या.
आगासन गावात चार अनधिकृत नळ जोडण्या, एक अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र आणि दोन आरओ प्रकल्प तोडण्यात आले. यात दोन पंप जप्त करण्यात आले. पाच पीव्ही टाक्या तोडण्यात आल्या. विटांच्या टाकीचे एक बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवस मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.