मोबाईल डाटा चोरून विकणारे दोन पोलीस बडतर्फ

ठाणे: मुंबईतील जोडप्याला धमकावून खंडणी उकळणाऱ्या ठाणे पोलिसांना निलंबित केल्याची घटना नुकतीच घडली असताना मोबाईलमधील डाटा विकणाऱ्या दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे.

मोबाईल फोन क्रमांकांचा डाटा चोरी करून विकणाऱ्या पोलीस शिपायांची नावे आकाश सुर्वे (३६) आणि हर्षद परब (३१) अशी आहेत. यांना निलंबित करण्यात आले असून मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपुत (२८) यालाही ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिघांना येत्या ११ मे २०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे शहर सायबर पोलीस ठाण्यातच नेमणुकीस असलेले अटकेतील पोलीस शिपाई आकाश सुर्वे ( रा. नवी मुंबई) आणि पोलीस शिपाई हर्षद परब (रा. कळवा) या दोन्ही पोलीस अंमलदारांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ते लोकसेवक म्हणून करीत असलेल्या कर्तव्याचा गैरवापर करून मोबाईल फोन क्रमांकांचा डाटा चोरून तो डाटा राबोडी आकाशगंगा रोड येथील मोहम्मद सोहेल राजपुत या सराईत गुन्हेगारास विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गांभिर्याने दखल घेवून, पुढील ठोस कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे, त्या दोन्ही पोलिसांना पोलीस सेवेतून ‘बडतर्फ’ करण्यात आले आहे. या गैरप्रकाराबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ करत आहे.

सुर्वे २०१४ आणि परब २०१८ मध्ये पोलीस दलात भरती झाले. ते दोघे साधारणपणे २०२२ पासून ठाणे पोलिसांच्या सायबर पोलीस व डाटा चोरून त्याला कवडीमोल किमतीत विकत होते, अशी माहिती पुढे आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.