नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडण्यासाठी नव्या मार्गिकेला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली असतानाच सिडकोने या विमानतळाच्या पुर्वेकडील बाजूस मुंबई-शीव महामार्गास समांतर अशा आणखी एका मेट्रो मार्गिकेची आखणी केली आहे.
मेट्रो १ (अ) आणि मेट्रो -२ अशा दोन नव्या मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यातील एक मार्गिका मुंबई-नवी मुंबई मेट्रो-८ मार्गिकेस जोडली जाणार आहे. ५५५७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प उन्नत असणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा शुभारंभ होण्यापुर्वी सिडकोने बेलापूर ते पेंढार दरम्यान मेट्रो मार्गिका एक कार्यान्वित केली आहे. बेलापूर-खारघर-पेंढार या मार्गावर ११ स्थानकांसह सुरु असलेल्या या प्रकल्पास प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी असला तरी भविष्यात तो वाढेल अशाप्रकारचे नियोजन आहे. नवी मुंबई विमानतळ सुरु झाल्यानंतर या प्रकल्पाच्या भोवती मेट्रो मार्गिकांची आखणी वेगाने केली जात असून राज्य सरकारने मेट्रो -८ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर सिडकोने विमानतळाच्या पुर्व भागास जोडणाऱ्या नव्या मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.
मेट्रो -८ प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर या उपनगरांदरम्यान प्रथमच मेट्रो मार्गिकेचा विस्तार होणार आहे. हा विस्तार होत असताना ही मार्गिका बेलापूर ते सागर संगम या नव्या मेट्रो मार्गिकेने जोडण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. मेट्रो १ (अ) आणि मेट्रो-२ अशा दोन नव्या मार्गिकांची आखणी करण्यात आली असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे सिंघल यांनी स्पष्ट केले. या दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती मेट्रो मार्गिकांचे नवे वर्तुळ उभे राहील, असा दावाही सिंघल यांनी केला.
नवी मुंबई मेट्रो लान १ चा विस्तार करत सीबीडी बेलापूर ते विमानतळाच्या पश्चिमेकडील बाजूस सागर संगम पर्यत नवी मार्गिका आखण्यात आली आहे. सद्यस्थितीत पेंढार (तळोजा) ते बेलापूर अशी मेट्रो मार्गिका कार्यान्वित आहे. ही मार्गिका सीबीडी रेल्वे स्थानक परिसरातून नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील सागर संगम स्थानकाच्या दिशेने नेण्यात येणार आहे. तेथून ही मार्गिका मुंबई-नवी मुंबई मेट्रो मार्गिका-८ चा एकमेकांशी जोडली जाईल आणि पुढे नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाईल. या मार्गिकेची लांबी तीन किलोमीटर इतकी असणार आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गिका -२ हा सिडकोने आखलेला १७ किलोमीटर अंतराचा महत्वकांक्षी प्रकल्प पेंढार (तळोजा) पासून नवी मुंबई विमानतळाच्या पुर्वेकडील भागास ११ स्थानकांचा असणार आहे. आसावरी, तळोजा सेक्टर १५, एमआयडीसी, नावडे रेल्वे स्थानक, कुदूपाडा गाव, रोडपाली बस स्थानक, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर या उपनगरातून नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल चारच्या दिशेने ही मेट्रो मार्गिका मार्गक्रमण करेल. २०३१ पर्यत प्रति वर्षी सहा लाख तर २०५० पर्यत प्रती वर्षी १३ लाख प्रवासी या मार्गिकेने प्रवास करतील असा अंदाज या प्रकल्प अहवालात नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी ५५५७ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सिंघल यांनी दिली.