रहिवाशांची प्रदूषणातून होणार सुटका
ठाणे: ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रदूषणाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. प्रकल्पाच्या खोदकामातून निघणारी माती भूमिगत मार्गानेच वाहतूक केली जाईल, असे श्री.शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर भुयार खोदकामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास दीड तासांवरून केवळ १५ मिनिटांवर येणार आहे. मात्र, खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषण, धूळ आणि वाहतूक कोंडी वाढण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी संबंधित प्राधिकरणाकडे निवेदन देत पर्यायी उपाययोजनांची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समस्या मांडली. यावेळी मातीची वाहतूक शक्यतो पूर्णपणे भूमिगत मार्गानेच केली जाईल. तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास काम त्वरित थांबविण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.