बे केबिन भागात इमारतीचा पाया भरताना घडली घटना
ठाणे : इमारतीचा पाया भरताना मातीचा ढिगारा कोसळून तीन मजूर गाडले गेले. यात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ठाण्यातील बी केबिन परिससरात घडली आहे.
निर्मल राब (४९) रा. शिवाजी नगर, मुंब्रा असे गंभीर जखमी असलेल्या मजुराचे नाव आहे. हबीब शेख (४२) रा. शंकर मंदिर मुंब्रा आणि रणजित अशी दोन मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत. बी केबिन संतोषी माता मंदिराच्या पाठीमागे एका इमारतीचे काम सुरू आहे. त्याच्या तळघरात पायाभरणी करण्याचे काम सुमारे सात ते आठ मजूर करत होते. संध्याकाळी ५ ते ६च्या दरम्यान अचानक मातीचा ढिगारा कोसळून यात तीन मजूर गाडले गेले. यात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. जखमीस प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरीरात सळई गेली होती, त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरानी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.