भिंत कोसळून दोन ठार, एक जखमी

भाईंदर : भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाण्याच्या समोरील इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यावेळी भिंत कोसळून दोन कामगार ठार तर एक जण जखमी झाला.

नूतनीकरण करण्यास सोसायटी पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली असतानाही सदर गाळेधारकाने रविवारी दुरुस्तीचे काम सुरू केले. गाळ्यामधील पाण्याच्या टाकीखालील भिंत काढून टाकत असताना भिंत कोसळून त्याखाली दोन कामगार मयत झाले तर एक जखमी झाला असल्याचे अग्निशमन अधिकारी दिलीप रणावरे यांनी सांगितले.

घटनास्थळी आयुक्त संजय काटकर यांनी भेट देऊन उपायुक्त रवी पवार यांना गाळेधारक विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवघर पोलीस ठाण्यासमोरील श्री नाथ ज्योती इमारतीच्या तळमजल्यावर डॉ. विनयकुमार त्रिपाठी यांचा दवाखाना असून लगतच्या गाळ्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. दुरुस्तीकाम करण्याबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांनी हरकत दाखल केली होती. त्यानुसार प्रभाग अधिकाऱ्यांनी गाळेधारकास काम बंद ठेवण्यास सांगितले. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दुरुस्तीचे काम सकाळी सुरू करण्यात आले. गाळ्यामधील पाण्याच्या टाकीखालील भिंत काढण्याचे काम सुरू असतानाच भिंत कामगारांच्या अंगावर कोसळल्याने दोघे जण मयत झाले आहेत. हरीराम चौहान (५५), मखनलाल यादव (२६) ही मयतांची नांवे असून आकाशकुमार यादव जखमी असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळी १०-४५ वाजता महापालिका अग्निशमन विभागास घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे सह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आयुक्त संजय काटकर व उपायुक्त रवी पवार यांनी ही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर घडलेल्या दुर्घटनेबाबत गाळेधारक विरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.