आंबिवली-बल्याणी रस्त्यावरील अपघात दोन जण जखमी

जीवितहानी झाल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का?

कल्याण : आंबिवली-बल्याणी रस्त्यातील नायलॉन प्लांटनजीक एक रिक्षा रविवारी रात्रीच्या सुमारास रस्यात टाकलेल्या ग्रीटमुळे पलटी झाल्याने या अपघातात रिक्षा चालकासह दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर जीवितहानी झाल्यावरच रस्ता दुरस्त होणार का असा सवाल माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी  प्रशासनाला विचारला आहे.

आंबिवली-बल्याणी रस्त्याची खड्यामुळे चाळण झाली असून  एनआरसी कंपनीच्या भिंतीचे डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. रविवारी रात्री ९ वाजता सुमारास मानवली येथे राहणारे रिक्षा चालक कपिल गायकर हे बल्याणीहून आंबिवलीकडे प्रवासी घेऊन जात होते. नायलॉन प्लांटनजीक ठेकेदाराने टाकलेल्या ग्रीट पावडरच्या ढिगाऱ्यामुळे रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक कपिल यांच्या हातावर तसेच प्रवासी सदाम शेख यांच्या पायावर पलटी झालेल्या रिक्षाचा भार पडला. तेथुन जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने मदत करीत पलटी झालेल्या रिक्षातून जखमी कपिलसह प्रवाशांना बाहेर काढले.

त्यांना तातडीने रक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले. कपिल यांच्या हाताला फँक्चर झाले असुन सद्दाम यांच्या पायाला इजा झाल्याचे रिक्षा चालक कपिल गायकर यांनी सांगितले. तसेच इतर रिक्षा चालक सहकाऱ्यांनी टिटवाळा पोलिसांना कळविले असल्याचे सांगत संर्दभीत ठेकदाराने निष्काळजीपणे टाकलेल्या ग्रीट पावडरच्या ढिगाऱ्यामुळे हा अपघात झाला असून ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करणार आहोत असे सांगितले.