अंधधुंद दगडफेक करत एकमेकांना बेदम मारहाण
उल्हासनगर : उल्हासनगरच्या नेहमीच गजबजलेल्या नेताजी चौकात बुधवारी संध्याकाळी दोन गटांत तुफान राडा झाला. न्यू इंग्लिश स्कूलसमोरच भर रस्त्यात हाणामारी, अंधाधुंद दगडफेक आणि एकमेकांना बेदम मारहाणीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले.
प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये काही जुन्या वादावरून हा राडा झाला. हा वाद हातघाईवर गेला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू झाले. काही जणांनी लाठ्याकाठ्या आणि दगडांचा वापर करत समोरच्या गटावर आक्रमण केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावरून जाणारे लोक घाबरून बाजूला पळू लागले, तर काही दुकानदारांनी घाईघाईने शटर खाली ओढले. या हिंसाचारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. ‘आम्ही सुरक्षित कसे राहणार? आमच्या व्यवसायांवर परिणाम होत आहे. पोलिसांनी त्वरित कठोर पावले उचलली पाहिजेत’, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता पोलिस या प्रकरणात किती जलद आणि कठोर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटांना पांगवण्यात काहीसा उशीर झाल्याने मोठे नुकसान झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित आरोपींचा शोध सुरू केला आहे.