फसवणूकप्रकरणी ‘नायट्रो’च्या दोन कर्मचा-यांना कारावास

ठाणे : मुंबईतील भुलाभाई देसाई येथील आकृती बिल्डींगमध्ये असलेल्या ‘नायट्रो बीस्पोक फिटनेस सेंटर’मध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचा-यांना फसवणूक केल्याबद्दल आणि फिटनेस सेंटरच्या मालकाचा विश्वासाचा भंग केल्याबद्दल महानगर दंडाधिकारी गिरगाव ४० व्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून घेतल्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. ही घटना आॅगस्ट २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत झाली होती. अल्पेश लाड (रा. वरळी नाका) व शैलेश सोनावळे (रा. पाचपाखाडी ठाणे) असे दोन कर्मचारी लेखापाल म्हणून नायट्रो येथे कार्यरत होते. सोनावळे हा या फसवणुकीचा सूत्रधार होता. तो काहीवेळेस ठाण्यात किंवा काहीवेळा भुलाभाई येथे असे. मात्र या दोघांनी गुन्हेगारी हेतूने त्यांच्या मालकाची चार लाख ७७,८९५ रुपयांची फसवणूक केली आहे, असे पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत उघडकीस आले.

“कॉँप्लिमेंटरी मेंबर्स”च्या नावे बनावट पावत्या तयार केल्या आणि बँकेत रक्कम जमा मात्र केली नाही, तशी कबूली या दोघांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच ‘नायट्रो बीस्पोक फिटनेस सेंटर’मार्फत सोनिया डावखरे यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. ही लाखो रुपयांची फसवणूक उघड झाल्यावर खटल्याची सुनावणी महानगर दंडाधिकारी गिरगाव ४० व्या न्यायालयात झाली. साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. गावदेवी पोलिसांनी या खटल्याचे सर्व तपशील महानगर दंडाधिकारी नदीम पटेल यांच्या समोर मांडले होते. सरकारतर्फे बी.यु. गवळी आणि आरोपींची बाजू के.एन. मोरे यांनी मांडली. दोन्ही आरोपींना आयपीसीच्या कलम 420 अन्वये एक वर्षाचा कारावास आणि दंड आणि आयपीसीच्या कलम 408 नुसार दंडासह एक वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात झाली आहे, अशी माहिती ‘नायट्रो बीस्पोक फिटनेस सेंटर’च्या मालक सोनिया डावखरे यांनी दै.’ठाणेवैभव’ला दिली.