भिवंडीतील मध्यरात्रीची घटना
भिवंडी : शहरातील गौरीपाडा दर्गारोड येथील साहिल हॉटेल परिसरात दोन मजली इमारतीचा मागील भाग काल शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक कोसळला. झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत.
शहरातील गौरीपाडा घर नं. ४४१ या दोन मजली इमारतीला ४५ वर्षे झाले असून इमारतीच्या तळमजल्यावरील यंत्रमाग कारखाना होता. या इमारतीमध्ये एकूण आठ कुटुंब राहत होते. काही वर्षांपासून इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनी इमारत हलत असल्याची तक्रार केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने काल मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे. या इमारतीचा रस्त्याकडील भाग सुरक्षित असून मागील भाग अचानक कोसळला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमधील कुटुंबांना बाहेर काढले. इमारतीमधून एकूण आठ जणांना बाहेर काढले. त्यापैकी एकजण सुरक्षित होता तर एका महिलेसह बालिकेचा मृत्यू झाला असून पाच जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे.
श्रीमती उझमा आतिफ मोमीन (४०) व कुमारी तस्लिमा मौसर मोमीन (०८ महिने ) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे असून मोमिन लतीफ़ (६५), श्रीमती फरझाना अब्दुल लतीफ (५०), बुशरा अतिफ लतिफ(३२), आदिमा अतिफ मोमीन (७), उरुसा अतिफ मोमीन (०३) हे पाच जण जखमी झाले असून त्यापैकी कुमारी उरूस हिला उपचार करून घरी पाठविण्यात आले. इतर चार जणांवर शहरातील अल मोईन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचून त्यांनी रहिवाशांना बाहेर काढले. त्यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रिक्षामधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
भिवंडी महापालिकेचे आपत्ती विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशामक दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान देखील घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदत केली. तर महानगर पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी देखील रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनास्थळी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास संपूर्ण बचावकार्य थांबविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज रविवारी सकाळी या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान कोसळलेल्या इमारतीचा रस्त्यालगतच्या भाग कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांनी साहिल हॉटेल ते दर्गारोड हा मार्ग बंद केला आहे.