क्लस्टर योजनेच्या दोन इमारती दृष्टिपथात!

ठाणे: ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या पायाभरणीचा नारळ फुटल्यानंतर एक वर्षाने स्वप्नवत भासणार्‍या या योजनेच्या पहिल्या दोन इमारती दृष्टीपथात आहेत.

किसननगर येथे रबर इंडिया आणि दोस्ती डेव्हलपरच्या भुखंडावर सिडकोकडून बांधण्यात येणार्‍या क्लस्टरच्या पहिल्या इमारतीच्या तीन विंगचे १७ मजले चढले आहेत. तर रबर इंडिया कंपनीच्या इमारतीचे सहा मजले तयार झाले आहेत. या दोन इमारती वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर या इमारतीमध्ये उपलब्ध होणार्‍या १४०० सदनिकांमध्ये धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणार्‍या किसननगरच्या १७ हजार सदनिका धारकांचे कायमचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे हक्काच्या पक्क्या अधिकृत घराचे स्वप्न पाहणार्‍या ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१९९७ साली ठाण्यातील साईराज इमारत दुर्घटनेत १८ रहिवाशांचा बळी गेला. त्यानंतर लकी कंपाऊंडसह ठाण्यात धोकादायक इमारत कोसळण्याची मालिकाच सुरू झाली. आतापर्यंत इमारत दुर्घटनांमध्ये सुमारे शंभर निष्पाप जीवांचे बळी गेले. त्यामुळे ठाण्यातील धोकादायक, अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. आजमितीस ठाण्यात शेकडो इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराच्या इमारतींच्या पुर्नविकासाचा मुद्दा पुढे आला. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प ठाण्यात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिवसेनेसह सर्वपक्षीय सर्व आमदारांनी वेळोवेळी आंदोलने करत अखेर या प्रकल्पाला मंजूरी मिळवली.

ठाणेकर असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या योजनेला गती आली. मुख्यमंत्री होताच त्यांनी सर्वप्रथम या प्रकल्पाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करत गेल्या वर्षी ५ जून २०२३ साली देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या पहिल्या प्रकल्पाच्या पायाभरणीचा नारळ किसननगर येथे फुटला. आता ठिक दीड वर्षानंतर ज्या प्रकल्पाचा नारळ वाढवला त्या क्लस्टर योजनेच्या पहिल्या दोन इमारती आकाराला येत आहेत.

किसननगर जवळील मुंबई महापालिका आणि दोस्ती नेपच्यूनच्या उपलब्ध झालेल्या भुखंडावर सिडको, महाप्रितच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या पहिल्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. पायाउभारणीसाठी लागणारा कालावधी घेतल्यांनतर आता या इमारतीचे मजले वेगाने चढत आहेत. सुमारे अडीच हेक्टर भुखंडावर सुरू असलेल्या बांधकामात एकाचवेळी इमारतीच्या तीन विंगचे काम सुरु असून आतापर्यंत १७ मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण १८ मजले असलेल्या या इमारतीच्या तीन्ही विंगमध्ये सुमारे ३२३ चौरस फुट कारपेटच्या सदनिका बांधण्यात येत आहेत. त्यानुसार या प्रकल्पामध्ये १४०० घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणचे इमारतीच्या पहिल्या तीन मजल्यांमध्ये पार्कीग व्यवस्था देण्यात आली आहे. वास्तविक क्लस्टरच्या पहिल्या टप्प्यात १० हजार घरे उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी काही सदनिकांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर तातडीने किसननगर ब्लॉक ५०/५१ मधील धोकायदायक इमारतीत राहणार्‍या रहिवाशांचे पुर्नवसन या पक्क्या इमारतीमध्ये करण्याचे नियोजन आहे. ही इमारत पूर्ण होताच पुढील इमारतींचे बांधकाम वेग घेणार आहे.

ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिली मान्यता दिली. पण या प्रकल्पाच्या उभारणीत अनेक त्रुटींमुळे अडथळा येत होता. या प्रकल्पाला मूर्तरुप २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अ‍ेनक त्रुटी दूर करण्यात यश आले. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच या प्रकल्पाला वेग आला. भुसंपादनापासून ते प्रत्यक्ष बांधकामापर्यंतची मजल मारण्यासाठी या प्रकल्पाला तब्बल १० वर्षे प्रतीक्षा करावी लागली.