दीड कोटींच्या हस्तिदंतासह दोघांना अटक

ठाणे : तब्बल दीड कोटी रुपये किमतीचे हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीतील दोन सदस्यांना ठाणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले आहे.

संरक्षित वन्यप्राणी हत्तीचे हस्तिदंत घेऊन दोन इसम कोपरी आनंद नगर नाका येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना सादर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांना अटक करण्याची योजना केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट पाच वागळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या सूचनेनुसार 25 एप्रिल रोजी कोपरी, आनंदनगर नाका येथे सापळा लावला. त्या सापळ्यात आंतरराष्ट्रीय तस्कर मोहम्मद रफी इब्राहिम सय्यद (41) रा. कृष्णहरी/ तामिळनाडू आणि रहीम बादशहा खान (35) रा: अंधेरी पश्चिम गावदेवी डोंगरी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे चार किलो वजनाचे दोन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास वागळे युनिट पाचच्या अंतर्गत असलेल्या गुन्हा शाखेचे सहाय्यक निरीक्षक भूषण शिंदे करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आणि सह-आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके, निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील अहिरे आणि पोलीस हवालदार प्रकाश पाटील, विजय काटकर, सुशांत पालांडे, संदीप शिंदे, अजय साबळे, रोहिदास रावते, माधव वाघचौरे, महिला पोलीस हवालदार सुनीता गीते, पोलीस नाईक तेजस ठाणेकर व पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, उत्तम शेळके, चालक कॉन्स्टेबल यश यादव या पथकाने ही कारवाई केली आहे.