ठाणे: शिवसेना उपविभाग प्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिक सुहास सामंत यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते.
ठाण्यातील शिवसेनेच्या पहिल्या फळीतील कट्टर शिवसैनिक, स्व. आनंद दिघे, सतीश प्रधान यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पक्षाचे काम केले. सुरुवातीला उथळसर येथे ते राहत होते. त्यानंतर ते श्रीरंग सहनिवास येथे गोकुळधाम गृह संकुलात राहण्यास आले.
त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आणि परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिवसेनेतील जुन्या जाणत्या नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेसह विविध पक्षातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.