११ कुटुंबांना कोणताही मोबदला न देता घरावर बुलडोजर फिरवला

पालघरमधील प्रकल्पाविरोधातील वातावरण तापले

पालघर: जिल्ह्यातील धानिवरी येथे मुंबई-वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनासाठी प्रकल्प बाधितांना कोणताही मोबदला न देताच बेघर करण्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पालघरमधील प्रकल्पांविरोधातील राजकारण आणखीनच तापले आहे.

मुंबई-वडोदरा महामार्गाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू असून डहाणूतील धानिवरी येथे ११ कुटुंबांना घरांचा कोणताही मोबदला न देताच या घरांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात बुलडोजर फिरवण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून जोर जबरदस्ती करत या कुटुंबातील महिलांना घराबाहेर काढण्यात आले.

आमचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही, मात्र आमच्या घरांचा मोबदला आम्हाला द्या अशी मागणी करत येथील प्रकल्पबाधित आक्रमक झाले होते. यासंदर्भात 18 तारखेला संध्याकाळी नऊ वाजता च्या सुमारास या प्रकल्पग्रस्तांना घर खाली करण्याच्या नोटीस आल्या आणि 19 तारखेला सकाळीच या घरांवर जेसीबी फिरवण्यात आला. या सगळ्या घटनेनंतर पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांना आदेश देणाऱ्या सक्षम प्रांताधिकारी तसंच डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पालघर जिल्ह्यातील चारही सर्वपक्षीय आमदारांनी प्रकल्प पिडीतांची भेट घेतली यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा, शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील, ठाकरे गटाचे मुंबईचे आमदार सुनील शिंदे, माकपचे आमदार विनोद निकोले यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि खासदार ही उपस्थित होते.

या घटनेनंतर पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आढावा बैठकीचा आयोजन केलं असून या बैठकीत देखील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे कोणतही ठोस आश्वासन न मिळाल्याने आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय आमदारांनी पुन्हा एकदा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार निदर्शने केली.