मुंब्र्यात बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक

ठाणे : बनावट नोटा तयार करुन चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, लॅपटॉप १०० रुपये दराच्या सुमारे ३५० बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत.

या प्रकरणात मोहम्मद जैद चाँदबादशहा शेख (२५) आणि एका १७ वर्षीय मुलाचा यात सामावेश आहे. मुंब्रा येथील वाय जंक्शन भागात एकजण बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मोहम्मद जैद चांदबादशहा शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, पोलिसांना त्याच्या पिशवीत १०० रुपये दराच्या ३५० बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व चलनी नोटांवर एकच क्रमांक होता. पोलिसांनी त्याची चौकशी त्याचा एक १७ वर्षीय साथीदार या बनावट नोटा घरातच बनवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाच्या घरी जाऊन झडती घेतली.

पोलिसांना पाहताच त्याने ५०० रुपये दराच्या बनावट नोटांची १५ कागदांची पाने, २०० रुपये दराची नऊ आणि १०० रुपये दराची १६० पाने पाण्यामध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या घरामध्ये एक लॅपटॉप, चलनातील १०० रुपये दराच्या ९१ बनावट नोटा, कागद असा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी यापूर्वी अशा बनावट नोटा चलनात आणल्या होत्या का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.