उल्हासनगर गुन्हे शाखेने केली कारवाई
उल्हासनगर: उल्हासनगर गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्यावर अर्धा डझनहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी आपला शौक पूर्ण करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल सुरेश जाधव यांना दोन आरोपी चोरीची रिक्षा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, हेडकॉन्स्टेबल शेखर भावेकर, सतीश सपकाळे, विजय जीरा, पोलिस हवालदार प्रसाद तोंडिलकर यांच्या पथकाने त्या ठिकाणी पोहोचून संतोष गुरुराज पाटील (२७) आणि संजा मकवा (२७) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी दोन रिक्षा आणि दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, लूट, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरल्यानंतर ते मौजमजेसाठी बदलापूरला निघाले, मात्र वाटेत रिक्षा उलटून समोरची काच फुटली. यानंतर त्यांना तेथेच त्यांनी रिक्षा सोडून शेजारी उभी असलेली दुसरी रिक्षा चोरून पळ काढला. आरोपींनी डर्बी हॉटेलजवळून मुकेश धनवानी यांची दुचाकीही चोरून नेली होती. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उल्हासनगर गुन्हे शाखेने आरोपींना बदलापूर पूर्व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.