गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहमती
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ मजली दोन निवासी इमारती बांधण्यात येणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भेट घेऊन विशेष बाब अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
अंबरनाथच्या पश्चिमेकडील मोडकळीस आलेल्या पोलीस कर्मचारी निवासी इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी याकरिता आमदार डॉ. किणीकर पाठपुरावा करत आहेत. उप मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार डॉ. किणीकर यांनी सोमवार १९ (सप्टेंबर) रोजी भेट घेतली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार डॉ.किणीकर यांना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शासन स्तरावर तत्कालीन गृह राज्यमंत्री यांच्याकडे आयोजित बैठकीत पोलिसांच्या निवासी इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. या इमारतींकरिता आवश्यक असलेले आराखडे व नकाशे देखील वास्तुविशारद, सल्लागाराकडून तयार करण्यात आले आहेत. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने या इमारतींच्या कामाकरिता अडचणी निर्माण झाल्या होत्या.
राज्य शासनाचे पोलिसांकरिता घरे या धोरणाच्या अनुषंगाने या इमारतीच्या बांधकामासाठी विशेष बाब म्हणून आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिल्यास बांधकाम पूर्ण होऊन सुसज्ज अशा इमारती तयार होतील, अशी मागणी आमदार डॉ.किणीकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे पोलिसांचा सुसज्ज व योग्य सोयी सुविधा असलेली घरे उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास आमदार डॉ.किणीकर यांनी व्यक्त केला आहे.
अंबरनाथ पोलीस स्थानकानजीक असलेल्या पोलिसांची निवासी इमारत मोडकळीस आल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांच्या ठिकाणी टाईप दोनची प्रत्येक मजल्यावर आठ सदनिका असलेली २५ मजली इमारत तसेच प्रत्येक मजल्यावर दोन सदनिका यानुसार २५ मजली इमारतीत एकूण २४४ सदनिका असलेल्या इमारती साकारण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.