शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’

ठाणे-मुंबईसह राज्यात जल्लोष

मुंबई: अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे मुळ नाव आणि पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रिय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ गटाला नवीन निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्त्यांनी तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले असल्याची माहीती दिली आहे.

तुतारी हे एक पारंपारिक वाद्य असून ते रणभुमीवर युद्ध सुरु होण्यापुर्वी वाजवलं जात होतं. रणशिंग प्रकारातील हे वाद्य मराठा इतिहासाचा साक्षिदार मानला जातो. निवडणूक आयोगाने दिलेल्या या चिन्हामध्ये एक पारंपारिक पोषाख परिधान केलेला माणूस तुतारी वाजवताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर पक्ष आणि पक्षाचे चिन्ह मिळण्यासाठी दोन्ही गटाकडून दावा केला गेला. यामध्ये अजित पवार गटाने बाजी मारून मूळ पक्षासह पक्षाचे चिन्ह आपल्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे शरद पवार गटाने सुप्रिम कोर्टात धाव घेऊन आपल्याला नविन चिन्ह मिळावे असा दावा केला. त्यावर सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, निवडणूक आयोगालाही अर्ज दाखल झाल्यानंतर आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याच्या सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. यावर, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवल्यानंतर एकाही चिन्हाला निवडणूक आयोगाने संमती दिली नाहीच पण आयोगाकडून तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिलं गेलं आहे.

या संदर्भात माहीती देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून एक पोस्ट लिहीण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये केशवसुतांच्या कवितेच्या ओळीने सुरवात करताना, “एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने. दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!”असे म्हटले आहे.

तसेच आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या. तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”, असल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.