वासिंद येथील सभेत शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर आगपाखड
शहापूर: या देशाची सत्ता सातत्याने दहा वर्षे नरेंद्र मोदी यांच्या हातात होती. त्या अनुषंगाने लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवून देश एकसंघ ठेवणे हे मोदी सरकारचे काम होते. मात्र देशाचे सामाजिक ऐक्य राखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. या शिवाय देशातील गंभीर समस्यांकडे कानाडोळा करून विरोधकांवर टीका करण्यात समाधान मानत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार यांनी केला.
भिवंडी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या शहापूर विधानसभा मतदार संघातील वासिंद येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, शेतकरी, आदिवासी व बेरोजगारी या गहन समस्यांवर उपाययोजना करुन त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे यावर भाष्य करण्याचे सोडून प्रधानमंत्री मोदी हे विरोधकांवर टीका करण्यात धन्यता मानतात. किंबहूना मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते. दरम्यान आपण संसदीय लोकशाही स्विकारली मात्र त्यावर आघात करण्याचे काम या काळात केला जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ही निवडणूक देशाला योग्य दिशा दाखवण्यासाठी झाली पाहिजे.
कपिल पाटील यांनी या दहा वर्षात भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी कोणतेही ठोस कार्य केले नसल्याचा आरोप करत त्यांना गोडाऊन माफिया का म्हटले जाते हे कळत नाही, असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी काढला. दिल्ली दरबारी शेतकरी व आदिवासींचे कोणतेही प्रश्न त्यांनी मांडले नसून आम्हाला 2014 च्या आधीचे दिवस परत करा, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे, आ.सुनिल भूसारा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, अशोक ढवळे आदींची भाषणे झाली. यावेळी ठाणे-पालघर महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाडाळे धरण आणि परप्रांतीयांची दादागिरी
मुरबाड तालुक्यातील पाडाले येथील कालव्याचे भूसंपादन आदेश नसतांना 250 सातबारा आणि 450 शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात दंडेलशाही पद्धतीने ताब्यात घेऊन परप्रांतीय ठेकेदाराने शासनाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने पर्यायाने हुकूमशाही पद्धतीने काम सुरू केले असल्याने संजय राऊत यांनी नमूद करत याचा खरपूस समाचार घेतला. याबाबतचे निवेदन मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी संजय राऊत यांना दिले असता त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान याचे वाचन करत या विषयावर योग्य उपचार केले जातील, असेही त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले.