वापरलेल्या-सुस्थितीतील वस्तू ‘आरआरआर’ केंद्रांवर द्या-आयुक्त
ठाणे : ठाणेकर नागरिकांना त्यांच्याकडील आता वापरात नसलेल्या पण टीकाऊ आणि पुन्हा वापरता येतील अशा वस्तू दान करता याव्यात यासाठी ठाणे महापालिकेने मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालये अशा १० ठिकाणी ‘आरआरआर’ केंद्रे सुरू केली आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील या केंद्राचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले.
वापरण्यायोग्य चांगल्या वस्तू स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त चांगल्या वस्तू दान कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केले आहे. या उद्घाटन प्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, मुख्य लेखा परिक्षक संजय पतंगे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत ‘शून्य कचरा संकल्पने’कडे महापालिकेची वाटचाल सुरू आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, त्यातून नागरिकांचे आरोग्य उत्तम व्हावे हा उद्देश आहे. घरात पडून असलेल्या पण वापरता येण्याजोग्या चांगल्या वस्तू गरजूंच्या उपयोगी पडू शकतील. या उद्देशाने, पुस्तके, जुनी खेळणी, कपडे, इ-कचरा गोळा करण्यासाठी ‘आरआरआर’ म्हणजेच, माफक वापर (रिड्यूस), पुर्नवापर (रीयूज), परिवर्तन करून पुर्नवापर (रिसायकल) ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी, ठाणे महापालिका क्षेत्रात, पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालय आणि नऊ प्रभाग समिती कार्यालये येथे ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.