१० गुन्ह्यांची उकल, साडेचार लाखांची वाहने जप्त
भिवंडी : मौज-मजेकरिता वाहनांची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका आरोपीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर त्याचे दोन साथीदार अल्पवयीन विधी संघर्ष बालके आहेत.
शेरजली इमाम फकीर उर्फ पिल्या (२२) रा.गायत्रीनगर, भिवंडी असे हद्दपारीची कारवाई केलेल्याचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडे चौकशी करून त्यांच्याकडून शांतीनगर, भिवंडी तालुका आणि कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील वाहन चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आणून चार लाख ३५ हजार रुपये किमतीच्या नऊ मोटारसायकल व एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत होत्या. त्यानुषंगाने पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गर्शनाखाली शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (प्रशा) विनोद पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडूरकर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस उप निरीक्षक सुरेश घुगे, पोलीस हवालदार संतोष पवार, रिजवान सैय्यद, संतोष मोरे, पोलीस नाईक श्रीकांत पाटील, किरण जाधव, किरण मोहीते, श्रीकांत धायगुडे, पोलीस शिपाई नरसिंह क्षीरसागर, रोशन जाधव, मनोज मुके, दिपक सानप, रूपेश जाधव, प्रशांत बर्वे या पोलिस पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली. तसेच नाकाबंदी करताना सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास शांतीनगर पोलिस करीत आहेत.