जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
ठाणे : मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात रान पेटले असताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीसाठी आदिवासी बांधव देखील आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. या मोर्चाला ठाण्यातील साकेत मैदान येथुन सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करित सरकारचा निषेध केला. आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आरक्षणाबाबत विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे, असे सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. अशाप्रकारे जर आदिवासी समाजाचे आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केले तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू व सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू असा गंभीर इशारा आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.
आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनाने घेतला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्रे बनवून आदिवासी समाजाचे आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.