ठाणे : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ठाणे येथे एका सभेमध्ये ‘वॉटर टॅक्सी’ सेवेची घोषणा केली होती. मुंबई ते नवी मुंबईसाठी रस्त्याचा दररोजचा प्रवास एक ते दीड तास मोजावा लागतो आणि प्रदूषणही होतो आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक आणि प्रदूषणमुक्त वॉटर टॅक्सी सेवेमुळे हाच कालावधी अवघ्या 17 मिनिटांवर येणार आहे,असे म्हटले जात आहे.
मुंबई ते नवी मुंबई या दरम्यानचा प्रवास भविष्यात गतिमान होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यातील अंतर केवळ 17 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे,असेही सांगण्यात आले.
पर्यावरणपूरक आणि वेळ वाचवणा-या या सेवेमुळे मुंबईकरांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वॉटर टॅक्सी सेवेचा पहिला टप्पा मार्च 2025 पासून सुरु होणार आहे. यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जेट्टी बांधण्यात आली आहे.
भारतात 2020 मध्ये केरळमध्ये पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. मुंबई आणि ठाणे, डोंबिवली,कल्याण आदी शहरांमधील वाहनांची वाढतीच संख्या आणि दररोज होणारी वाहतूक कोंडी पाहता ‘इको फ्रेंडली वॉटर टॅक्सी’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो,असे ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड’च्या अधिका-याने सांगितले.