भिवंडीतील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

 

मतदार ओळखपत्रावर तृतीयपंथीय असा उल्लेख ही अभिमानाची बाब आहे..हे ओळखपत्र आमच्या जगण्याला बळ देणारं आहे..आमच्या वस्तीत पहिल्यांदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी आले आमच्यासाठी हा उत्सवाचा दिवस असल्याची भावना ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथी भगिनींनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याजवळ केली. निमित्त होते भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेले तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराचे.

 

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील भिवंडी येथे तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या विशेष शिबिरांना श्री. देशपांडे यांनी भेट दिली आणि तृतीयपंथी मतदारांना ओळ्खपत्राचे वाटप केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मुख्य निवडणूक अधिकारी यांचे विशेष कार्य अधिकारी दीपक पवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार अधिक पाटील, किन्नर अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणे आदी यावेळी उपस्थित होते.

 

दि. ३१ मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. पात्र सर्व तृतीयपंथीय नागरिकांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट ठेवून मतदार संघांतर्गत तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार भिवंडी येथील भंडारी कम्पाऊंड आणि गायत्री नगर येथे तृतीयपंथीय मतदार विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आज राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित तृतीयपंथी भगिनींनी आज पहिल्यांदा राज्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी आमच्या वस्तीत आले आमच्याशी संवाद साधला म्हणून भावनिक झाल्या होत्या.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात यावे त्यांनाही लोकशाही प्रकियेत सहभागी होता यावं यासाठी त्यांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे.मतदानाचा अधिकार हा तुम्हाला सक्षम करताना लोकशाहीमधील तुमचं महत्व अबाधित राखेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथी घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी प्रत्येक तृतीयपंथी भगिनींना शुभेच्छांचे पोस्टकार्ड पाठवावे जेणेकरून मतदार नोंदणी करताना त्या कार्डचा उपयोग हा रहिवासी पुरावा म्हणून करता येऊ शकेल. तृतीयपंथी भगिनींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज आल्यावर त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्या मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना श्री. देशपांडे यांनी केली.

जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, तृतीय पंथीय मतदार नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल असून ठाणे जिल्ह्यामध्ये त्यादृष्टीने चांगले काम केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे सहा हजार तृतीय पंथीय असून त्यांपैकी पात्र सर्वांची मतदार नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल यादृष्टीने कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. कोविड काळात समाजातील वंचित घटकांना जावणाऱ्या समस्यांमुळे प्रशासनाला त्यांच्याकडे लक्ष देता आलं त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या, असे त्यांनी सांगितले.

आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आणि आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी आमच्याकडे येऊन संवाद साधतात यापेक्षा भाग्याचा दिवस असू शकत नाही, अशी भावना अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणी यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी श्री. देशपांडे, श्री. नार्वेकर यांच्या हस्ते तृतीयपंथी नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तहसीलदार अधिक पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्याचे सादरीकरण केले. मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधून नाव वगळणी, तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेले प्रयत्न आदी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.