जिल्हा परिषदेतील ७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

ठाणे : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील ७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ही प्रक्रिया ठाण्याच्या खारकर आळी येथील एन. के. टी. सभागृहात पार पडली.

कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पडली असून १० टक्के बदल्या प्रशासकीय निर्णयात नमूद केल्याप्रमाणे तर पाच टक्के बदल्या विनंतीवर करण्यात आल्या.

शासन निर्णय १५ मे २०१४ मध्ये नमुद केल्यानुसार आदिवासी भागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी प्रशासन कटीबद्ध राहिले. प्राधान्य क्रमांचा विचार करता आदिवासी भागातील प्राधान्य क्रमाने, बिगर आदिवासी भागातील प्राधान्य क्रम, आदिवासी भागातील तीन वर्षे सतत सेवा झालेले प्राधान्य क्रम, बिगर आदिवासी भागातील कर्मचाऱ्यामधून संपुर्ण आदिवासी भाग भरण्यासाठी, विनंती बदली, आपसी बदली, उर्वरित विनंती बदली अशा प्रकारे बदली प्रक्रियांचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा परिषडेच्या १४ विभागांतील ७२ बदल्या करण्यात आल्या असून, अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभागातील प्रशासकीय ६१ बदल्या करण्यात आल्या. अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग व बांधकाम विभागातील ७ विनंती बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभाग व ग्रामपंचायत विभागातील ३ आपसी बदल्या करण्यात आल्या. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागातील संपर्क अधिकारी यांनी समुपदेशन कोणत्याही तालुक्यात पदस्थापना दिल्यास हरकत नाही असे नमुद केले. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने बदल्या करण्यात आल्या. कृषी विभाग व शिक्षण विभागातील बदली करण्यात आली नाही.

प्रशासकीय बदली १० टक्के प्रमाणे शासन निर्णयात नमुद केल्यानुसार तसेच विनंती बदली पाच टक्के करण्यात आली. शासन निर्णयातील तरतुदीनुसार व इतर धोरणात्मक बाबीनुसार आदिवासी भागातील रिक्त पदे प्राधान्याने भरून उर्वरित तालुक्यात समतोल राखुन सदर संपुर्ण बदली प्रक्रिया ही समुपदेशनाने पार पाडण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदली प्रक्रियेत दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे बदली यादी तयार करून, बदली प्रक्रियेत स्क्रीनवर रिक्त पदांची यादी दाखविण्यात आली व कर्मचार्‍यांना बदली ठिकाण निश्चित करण्याची संधी दिली गेली व पारदर्शकपणे बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली.

बदली प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांच्या अधिपत्याखाली पार पाडण्यात आली. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे तसेच विभाग प्रमुख समवेत अधिकारी व कर्मचारी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित होते. बदली प्रक्रिया समुपदेशन करुन पारदर्शकपणे करण्यात आली. सदर बदलीत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले.