२५६ ‘सुभेदारां’च्या बदल्या; मीरा-भाईंदर पालिकेत खळबळ

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या स्वयंघोषित ‘सुभेदारांच्या’ मक्तेदारीला वेसण घालून सुमारे २५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या आयुक्त संजय काटकर यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने पारित केल्या आहेत.

आयुक्तांच्या या कठोर निर्णयाने पालिका कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका बसला असून अजूनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयासह नगररचना विभाग, आस्थापना विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, प्रभाग कार्यालये, विभागिय कार्यालये अशा विविध मलईदार विभागातील एकाच पदावर दहा- दहा वर्षे अनेक सुभेदार ठाण मांडून बसले होते. त्या-त्या विभागातील कामकाजाची सूत्रे आपल्या हाती ठेवत स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. परिणामी हे कर्मचारी जागेवर नसल्यास कामासाठी महापालिका कार्यालयात पदरमोड करून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने ‘साहेब नाहीत’ हे ऐकून परत जावे लागत होते.

माहिती अधिकार अर्जासह भारतीय साक्ष अधिनियम कायद्याच्या अर्जांनाही फाट्यावर मारीत अर्जदारास कार्यालयात उपलब्ध माहिती न देता वाऱ्या करावयास लावणाऱ्या या सुभेदारांच्या सुरस कहाण्या आयुक्तांपर्यंत नागरिकांनी पोहोचविल्या. आयुक्तांनीही ‘गणेश उत्सवा’ची लगबग संपवून गौरी विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी हा ‘तोफगोळा’ उडविल्याने पालिका कार्यालयात जोरदार खळबळ माजली. मात्र या बदली आदेशावर आयुक्त संजय काटकर यांनी स्वतः स्वाक्षरी केल्याने सुभेदारांच्या रदबदलीचे दोर आयुक्तांनी आपल्या हाती ठेवले आहेत. त्यामुळे मागच्या दाराने बदली रद्द करण्याच्या कारस्थानालाही वेसण घातली गेल्याची चर्चा पालिकेतील सुभेदारांमध्ये सुरू आहे.