ठामपातील तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

ठाणे: अनधिकृत बांधकामांचे माहेरघर असलेल्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांसह तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करून दणका दिला आहे.

उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कळवा येथिल सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची बदली करण्यात आली आहे. तो पदभार त्यांना १ मार्च रोजी स्वीकारावा लागणार आहे. दिवा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र गिरी यांना पदोन्नती देऊन त्यांच्याकडे दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. दिवा प्रभाग समितीच्या उप कार्यालयीन अधिक्षक ललिता जाधव यांच्याकडे कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपाविण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त श्री. राव यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेतली आहे, त्यामुळे सहाय्यक आयुक्त यांच्यावर अनधिकृत बांधकाम निष्कासनाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहेत.