कडोंमपा सचिवाची एक महिन्यात बदली

कल्याण : परिमंडळ १ उपायुक्त धैर्यशील जाधव यांच्याकडील अतिरिक्त सचिव पदाचा कार्यभार काढून उपायुक्त वंदना गुळवे यांना देण्यात आला. सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी विराजमान होणार आहेत.

दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सचिवपदी मागील सहा वर्षाहून अधिक काळ विराजमान असलेल्या संजय जाधव यांची पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तडकाफडकी बदली करीत उपायुक्त धैर्यशील जाधव यांना अतिरिक्त सचिव पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. या विषयाची खंमग चर्चा त्यावेळी पालिका वर्तुळात रंगली होती. दरम्यान संजय जाधव यांच्याकडे सचिव पदाचा अनेक वर्षांपासून पदभार असल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. हा प्रशासकीय भाग असल्याचे सांगितले. मात्र सचिवांच्या नियुक्तीसह त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी पालिका आयुक्तांसह नगर विकास विभागाकडे करण्यात आलेल्या असल्याने अधिवेशनाच्या दरम्यान आयुक्तांनी या विषयात लक्षवेधी येऊ नये यासाठी सचिवांची बदली केली असावी असा सूर रंगला होता.