सिम्युलेटर यंत्रावर १३७५ दुचाकीस्वारांना प्रशिक्षण

ठाणे: दुचाकी रस्त्यावर चालवता येत असली तरी पक्के ‘लायसन्स’ मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेकजण गर्भगळीत होतात. त्याकरीता परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला आहे. गेल्या सव्वा वर्षात १३७५ दुचाकीस्वारांनी ‘सिम्युलेटर’ मशीनवर दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

‘मर्फी’जवळील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटरचे कक्ष ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकीस्वाराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जात आहे. सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपले कोणकोणते दोष आहेत हे समजण्यास मदत मिळत आहे. दुचाकीस्वाराने वाहतुक नियमानुसार गाडी चालविणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील सिग्नल, खुणा, वेग मर्यादा, आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून “टेस्ट ड्राईव्ह”ची परीक्षा देणे सर्वोत्तम असते. मात्र परीक्षेत वाहन चालविताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केले जाते. हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

सिम्युलेटर मशीनवर सर्व मांडणी दुचाकीसारखी आहे. केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचे आहे. यात एक्सलेटर, गियर, आदी सर्व यंत्रणा असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते, चौक, सिग्नल, नागमोडी वळण, खड्डे, पाऊस, शाळा, रुग्णालय, धुके आदी सर्व दाखविले आहे.

शहर/महामार्ग, कमी जास्त गर्दी , विविध प्रकारचे हवामान, विविध प्रकाशयोजना, पाऊस, धुके इत्यादी प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करता येते, ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालविण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते. शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीनवर दिसतो,असे रोहित काटकर (ठाणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले.

सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालविण्याचा फील दिला आहे. या सिम्युलेटरमध्ये सिग्नल, रस्ते, नागमोडी वळणे, पाऊस, गतिरोधक आदी सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे चालकांना दुचाकी चालवताना दोष समजणार आहेत, अशी माहिती निहाल पाटील (प्रशिक्षक, युनायटेड वे मुंबई संस्था) यांनीही दिली.