पुर्नआखणीचा आराखडा तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश
ठाणे: कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथील वाहतुकीचे परिचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या दोन्ही जंक्शनची पुर्नआखणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा (टोटल स्टेशन सर्व्हे) करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वरील वाहतुकीचे परिचलन अनियोजित पद्धतीने होत आहे. मोकळ्या मैदानात वाहने हवी तशी ये जा करत असल्याचे चित्र या भागात दिसते. हे चित्र बदलण्यासाठी लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक बेटाची रचना यांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. वाहतुकीचे परिचलन सुनियोजित पद्धतीने व्हावे म्हणून आराखडा तयार करून त्याची जलद अमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांवर असमाजिक तत्त्वांचा वावर असतो. गर्दुल्ले असतात. अनधिकृत पार्किंग केले जाते. याला आळा बसण्यासाठी मळक्या, अस्वच्छ जागा साफ करून तेथे नियंत्रित अधिकृत पार्किंग केले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या जात आहेत. जागेच्या वापराबरोबर महापालिकेस त्यातून उत्पन्नही मिळेल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
महापालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या या आढावा बैठकीस, पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड, नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उप नगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे उपस्थित होते.
माजिवडे पुलाखालील बेकायदे गाळे तोडा
माजिवडे नाक्यावरील नाशिककडे जाणाऱ्या पुलाखाली अनधिकृतपणे गाळे बांधण्यात आले असून प्रभाग समितीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे तर आयुक्तांनाही जागर संस्थेने तीन पत्रे आतापर्यंत दिली आहेत. हे गाळे तोडल्यास ही जागा मोकळी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रशासनाने परवानगी दिल्यास पुलाखाली उद्यानही फुलवण्याची तयारी संस्थेने दाखवली आहे. आयुक्तांनी याबाबत प्रभाग समितीला निर्देश दिल्यानंतरही या गाळ्यांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.