वाहतूक नियम मोडले; २४ तासांत ११ लाख मोजले

वाहन चालकांना कारवाईचा दट्ट्या

ठाणे : वाहतूक नियमांची ऎशी तैशी करणाऱ्या सुमारे तीन हजार वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करून एका दिवसात वाहतूक पोलिसांनी दहा लाखांच्या दंडाची चलने फाडली आहेत.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने १४ फेब्रुवारी मध्यरात्री ते १५ फेब्रुवारी दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्या ९५६ वाहनचालकांकडून एक लाख ९१,२०० तर दुचाकी चालविणाऱ्या १,९७० चालकांकडून नऊ लाख ८४ हजार असे एकूण २,९२६ चलन फाडून वाहनचालकांकडून ११ लाख ७५,२०० रुपये दंडाची चलने फाडण्यात आली आहेत. चालकांना हा दंड न्यायालयात भरावा लागणार आहे.

भिवंडी, नारपोली आणि विठ्ठलवाडी येथे अनुक्रमे १००, २२७ आणि १६८ वाहनचालक विना सीटबेल्ट गाडी चालवत असल्याचे आढळले आहेत तर नौपाडा येथे फक्त एका वाहन चालकाने नियम मोडला होता. दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण  नारपोली, कापूरबावडी, अंबरनाथ, कासारवडवली, ठाणे नगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले आहेत.

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात अचानक कारवाई करण्याची मोहीम यापुढे देखिल राबविण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.