ठाणे : पातलीपाडा येथील श्री माँ शाळेच्या मैदानात नुकत्याच झालेल्या “ठाणे जिल्हा सब जुनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप” स्पर्धेत ट्रॅक अँड फील्ड मास्टर्स क्लबच्या मुलांच्या गटाने चॅम्पियनशिप पटकावली.
या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातून जवळपास 500 खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत ट्रॅक अँड फील्ड मास्टर्स क्लबच्या मुलांच्या गटाने चॅम्पियनशिप पटकावली असून यामध्ये क्लबच्या सर्व खेळाडूंनी सांघिक कौशल्य दाखवून विजयश्री प्राप्त केली. तसेच मुलींच्या गटात व जनरल चॅम्पियनशिपचे उपविजेतेपदही क्लबने प्राप्त केले. त्यामुळे क्लबच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले. हे सर्व खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता चव्हाण यांच्याकडे दादोजी कोंडदेव स्टेडियम स्टेडियम, ठाणे येथे दररोज सराव करतात. स्पर्धेतील पदक विजेते सर्व खेळाडू ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर स्पर्धेत ठाण्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ठाणे जिल्हा सब ज्युनियर स्पर्धा २०२४ मध्ये ट्रॅक अँड फील्ड मास्टर्स क्लबच्या जियांश पाटील याने 100 मीटर धावणे आणि स्टँडिंग जंप या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, अवनी अरबत्ती, अर्णव आयर या दोघांनीही गोळा फेकमध्ये सुवर्णपदक, रुद्रांश राणे याने 50 मीटर व 100 मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक, सानिका बागुल हिने 300 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक व लांब उडीमध्ये रौप्यपदक पटकावले. सोहम दुर्वे याने उंच उडी मध्ये सुवर्णपदक तर हर्षल गोसावी याने रौप्यपदक पटकावले. धनराज गायकवाड याने गोळा फेक मध्ये रौप्यपदक, कश्वी करंजकर 50 मीटर व 100 मीटर धावणे स्पर्धेत रौप्यपदक, आरोही नलावडे हिने उंच उडी स्पर्धेत कांस्यपदक, मानवी इंगळे हिने गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.