पर्यटनाने माणूस अनुभवसंपन्न आणि समॄद्ध होतो – डॉ. कोल्हटकर 

कल्याण : मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंच विश्वभ्रमंती दिवाळी अंक २०२३ चा प्रकाशन सोहळा कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात थाटात पार पडला.

दरवर्षी मंचातर्फे प्रवास वर्णन, पुस्तक स्पर्धा आणि प्रवासपर लेख (निबंध) स्पर्धा घेतली जाते. त्यातल्या विजेत्या प्रवास वर्णन लेखांना या अंकात अगक्रम देण्यात येतो. विजेत्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, काही रोख रक्कम आणि अंक देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. कार्यक्रमाला यावर्षी प्रमुख वक्ते म्हणून डोंबिवलीकर प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ लेखक डॉ. उल्हास कोल्हटकर, नामवंत लेखिका- गायिका मधुवंती पेठे उपस्थित होते. मंचाचे अध्यक्ष ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ जातीने उपस्थित होते. त्यांनी मंचाच्या बारा वर्षाच्या वाटचालीची समग्र माहिती दिली.

प्रवासवर्णन पुस्तक स्पर्धेत रामदास म्हात्रे लिखित ’दी फ्लोटींग लाईफ इन मर्चंट नेव्ही’ यांना प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच बरेचसे प्रवास वर्णन, लेख स्पर्धा विजेते खास पुण्याहून आले होते. जे विजेते नाहीत पण अंकात लेख आहेत असे लेखकही खास अंकासाठी पुण्याहून आले होते. प्रमुख वक्ते डॉ. कोल्हटकर यांनी उदाहरणासह प्रवासाचे महत्व आणि दिवाळी अंकाचा इतिहास तसेच सध्याच्या उपलब्ध अनेक दिवाळी अंकाबद्दल आपल्या खुमासदार शैलीत माहिती देऊन सभागृहाला हसविले. पर्यटनाने माणूस अनुभव संपन्न आणि समॄद्ध होतो असे सांगून डॉ. कोल्हटकर यांनी मंचाच्या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले. तर मधुवंती पेठे यांनी आपल्या मनोगताने पर्यटन आणि आयुष्यातील प्रवासाचे महत्व याबद्दल बोलताना सभागृहाला मंत्रमुग्ध केले. त्यांनी मंचाच्या माध्यमातून अनुभवांची देवाणघेवाण व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली. दिवाळी अंकाच्या निमित्ताने पर्यटक लेखकांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ आम्ही निर्माण केले असून त्याचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. बल्लाळ यांनी केले.

माधुरी बागडे (अलई) यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहल सोपारकर यांनी आभार प्रदर्शन केले. दिवाळी अंकाचे हे दहावे वर्ष होते.