उद्या तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येतील

‘तिरुपती’ येथील शिवरायांचा अवमानप्रकरणी मनसेचा इशारा

मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिरुपती बालाजी देवस्थान येथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर/मूर्ती काढायला लावली. या प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

फेसबूकवर व्हिडिओद्वारे जाधव म्हणाले की, ‘मागील काही दिवसांपासून एक प्रकार घडतोय. आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोक खासगी गाडीने तिरुपतीला जातात. यातील बहुतेक गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लावलेली असते. आपण महाराजांना देवाच्या स्थानी पाहतो, अनेकजण गणपतीऐवजी महाराजांची मूर्ती लावतात. पण, गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थानाला गेल्यानंतर तिथे महाराजांची मूर्ती काढली जात आहे. यामागे नेमकी काय मानसिकता आहे, हे माहित नाही.’

‘माझी तिरुपती बालाजीवर प्रचंड श्रद्धा आहे. मी वर्षातून 5-6 वेळा तिरुपतीला जातो. तिथे तिथले लोक त्यांच्या भाषेत बोलतात, त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. ते मान्य केलं, पण महाराजांची मूर्ती काढणे, फोटो काढणे, यात कोणती मर्दानगी आहे. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, तिथल्या प्रशासनाला याबद्दल बोललं पाहिजे. कारण, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सतत होत राहिलं, तर वाद होत राहणार. त्यामुळे तिथल्या प्रशासनाला बोलून मार्ग काढावा,’ असं जाधव म्हणाले.

‘कुठलाही वाद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. तिरुपती बालाजीला जेवढं मानतात, तेवढंच महाराजांनाही मानणारे लोक आहेत. त्यामुळे दोन देवांमध्ये वाद होऊ नये. आमची श्रद्धा आमच्याकडे राहू द्या, आम्ही आमच्या गाड्यांवर महाराजांचे स्टिकर आणि मूर्ती लावत आहोत. तुमच्या गाड्यांमध्ये महाराजांचे स्टिकर लावत नाहीयेत. अशा घटना पुढे होऊ नयेत, नाहीतर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही. उद्या तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येतील,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.