आयात आणि अंतर्गत वाढीव उत्पादनाचा शेतकऱ्यांना फटका
नवी मुंबई: एकीकडे टोमॅटोचे उत्पादन वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकार नेपाळमधून टोमॅटो आयात करत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. परिणामी त्याचे दर चांगलेच गडगडले आहेत.
देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यानंतर केंद्र सरकारने नेपाळवरून १० मेट्रिक टन टोमॅटोची आयात करण्याचा करार केला. त्यानुसार टप्याटप्याने टोमॅटो आयात सुरु झाली. तर राज्यात देखील टॉमेटोचे उत्पादन वाढले आहे. परंतु मागणीपेक्षा आवक अधिक असल्याने टॉमेटोला उठाव नाही, त्यामुळे सध्या टोमॅटोचे दर चांगलेच गडगडले आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. बाजारात अवघे १५-२० गाड्या दाखल होत होत्या. त्यामुळे किरकोळ बाजारात २००तर घाऊक बाजारातही १३० रुपयांनी विक्री होत होते.
ऑगस्ट अखेरपासून टोमॅटोची आवक वाढली असून त्यात केंद्र सरकारने टोमॅटो आयात केली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक अधिक असल्याने दर एकदम कोसळले आहेत. मागील आठवड्यात एपीएमसी बाजारात प्रतिकिलो १२-१४ रुपयांनी विक्री होणारे टोमॅटो सोमवारी मात्र ५-१० रुपयांनी विक्री झाले आहेत. शेतकऱ्यांना तीन ते पाच रुपये दर मिळत आहे. अचानकपणे टोमॅटोच्या दरात घसरण होत असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून अधिक टोमॅटो आवक होत आहे. सोमवारी एपीएमसीत ४३ गाड्या दाखल झाल्या असून १९७७ क्विंटल आवक झाली आहे. घाऊकमध्ये प्रतिकिलो ५-१० रुपये तर किरकोळ बाजारात २० रुपयांनी विक्री होत आहेत.