वानखेडेवर फडणवीसांची जोरदार ‘बॅटींग’
मुंबई : मुंबईतील वानखेडे मैदानावर एमसीएच्यावतीनने आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं तोंड भरुन कौतुक केले.
फडणवीसांनी आपल्या भाषणात शरद पवार, रोहित शर्मा यांचे क्रिकेटमधील योगदान सांगत स्तुतीसुमने उधळली. तर, दिवंगत अमोल काळे यांच्या आठवणी जागवत त्यांनी देखील अल्पवधीतच एमसीए आणि क्रिकेटसाठी लक्षात राहिल असे काम केले आहे. भारतीय क्रिकेट विकसित करणाऱ्या प्रशासकांमध्ये पवार साहेबांचं नाव अग्रणी असेल. एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम हे मोठे आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एमसीएच्यावतीने आज भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँडचे नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण करण्यात आले आहे. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचेही उद्घाटन झाले.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटींग केली. तसेच, क्रिकेट विश्वातील योगदानाबद्दल शरद पवारांवर जाहीरपणे स्तुतीसुमने उधळली. ‘मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मनापासून अभिनंदन करेल, की त्यांनी हा निर्णय घेतला. शरद पवार साहेबांबद्दल सांगायची गरज नाही. भारतीय क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम नक्कीच मोठे आहे. भारतीय क्रिकेटसाठी शरद पवारांचे मोठे योगदान असून आज भारतीय क्रिकेट ज्या स्तरावर आहे, त्याच श्रेय पवार साहेबांचे आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी वानखेड स्टेडियमवर जोरदार बॅटींग करत शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली. शरद पवारांचे नाव येथील स्टँन्डला देणे हा योग्य निर्णय आहे, असेही त्यांनी म्हटले.
एक लाख प्रेक्षक क्षमतेचे नवीन स्टेडियम
दरम्यान, मुंबईत एक लाख प्रेक्षक बसतील एवढ्या क्षमतेचं उत्तम क्रिकेट स्टेडियम उभारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. एमसीने त्यासंदर्भात प्रस्ताव दाखल करावा, महाराष्ट्र सरकार योग्य जागा देईल. एमसीएला पुढील चार वर्षात 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे, 100 वर्षांच्या पूर्तीवेळी या नवीन स्टेडियमचं अनावरण व्हावं, अशी इच्छाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.