बदलापूर-नेरळ येथे आज-उद्या विशेष पॉवर ब्लॉक

पादचारी पूल बंद करणार, गर्डर्सचे लॉंचिंंग

ठाणे : बदलापूर येथील सार्वजनिक पादचारी पूल बंद करण्यासाठी आणि नेरळ येथे पादचारी पूलाचे गर्डर्स लाँच करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष ट्रॅफिक  आणि पॉवर ब्लॉकचे आयोजन करणार आहे.

मुंबई विभागात  १८/१९ रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोड क्रेनच्या सहाय्याने बदलापूर येथील सार्वजनिक पादचारी पूलाचे डी-लॉंचींग आणि नेरळ स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजसाठी (एफओबी) गर्डर लॉन्च करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे.

अंबरनाथ-वांगणी अप आणि डाउन मार्गावर मध्यरात्रीनंतर १.२५ ते पहाटे ३.५५ पर्यंत (२ तास 30 मिनिटे), वांगणी-भिवपुरी रोड अप आणि डाउन मार्गावर मध्यरात्रीनंतर ०१.४० ते ०३.३० (एक तास ५० मिनिटे) अशा वेळापत्रकानुसार गाड्यांची चालवण्यात येणार आहे.

उपनगरीय गाड्यांचेही वेळापत्रक बदलण्यात येणार असून, छशिमट येथून कर्जतसाठी मध्यरात्रीनंतर ००.२४ वाजता सुटणारी लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. कर्जत येथून मध्यरात्रीनंतर ०२.३३ वाजता छशिमटर्मिनससाठी सुटणारी लोकल अंबरनाथ येथून चालविण्यात येईल.

अप एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-दिवामार्गे वळवण्यात येणार आहेत. भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस, हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस, विशाखापट्टणम-लो. टिळक टर्मिनस एक्सप्रेस वळवण्यात येतील. कल्याणला जाणा-या प्रवाशांसाठी पनवेल आणि दिवा येथे या गाड्यांना थांबा दिला जाईल आणि त्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

गदग-मुंबई एक्स्प्रेसचे नियमन वांगणी येथे केले जाईल आणि निर्धारित वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.