डोंबिवली : कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ -सुंदर- रेखीव असावी याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणा-या कायापालट अभियानाअंतर्गत ठिकठिकाणी दररोज साफसफाई मोहीम, रस्ते दुभाजक, सार्वजनिक भिंती रंगविणे ही कामे केली जात आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भिंतींना नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. मात्र असे असतांना काही नागरिक विध्वंसक वृत्तीने या सुंदर दुभाजकांवर थुंकून, पिचका-या मारुन केलेल्या सौंदर्यीकरणाला अवकळा आणत आहेत.
डोंबिवली, रेल्वे स्थानकालगत असलेला स्कायवॉक देखील काही नागरिकांच्या थुंकण्यामुळे अत्यंत बकाल दिसत असल्याचे लक्षात येताच महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्या निर्देशानुसार फ प्रभागक्षेत्र अधिकारी किशोर शेळके यांनी 8 मार्च रोजी स्कायवॉक पुर्णपणे झाडून स्वच्छ केला. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून सपना कोळी-देवनपल्ली यांनी स्वत: पुढाकार घेत डोंबिवली येथील डॉ. स्वाती गाडगीळ यांच्या डोंबिवली वुमेन वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकारी व महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे यांच्या समवेत स्कायवॉकवर समक्ष उभे राहून तेथून चालणाऱ्या नागरिकांना, ” येथे थुंकू नये ” याबाबत संदेश देत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्या पुढाकाराने आणि डॉ.स्वाती गाडगीळ यांच्या डोंबिवली वुमन वेल्फेअर सोसायटीच्या सौजन्यातून या स्कायवॉकवर कलात्मकरित्या, चित्रांच्या माध्यमातून रंगरंगोटी केल्यामुळे एक मनोहरी आगळे- वेगळे रूप या स्कायवॉकला प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.