सापळा रचून चोरट्याला ठोकल्या बेड्या
ठाणे : रेल्वेतून प्रवास करत असताना महिला प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सहिमत शेख (२९) रा. रबाळे, नवी मुंबई असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तपासादरम्यान त्याने सांगितले की, तो आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी चोरी करत होता.
कल्याण रेल्वे गुन्हे पथकाने दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदार महिला मंगलोर रेल्वे स्टेशन येथून निझामुद्दीन एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होत्या. सदरची एक्सप्रेस २३ मार्च रोजी डोंबिवलीनजीक कोपर रेल्वे स्टेशनवरुन जात असताना त्यांची उशाखालील पर्स चोरी झाली. यासंदर्भात महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305(C) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच अशा घटना मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये अनेकदा रात्रीच्या वेळी घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वरिष्ठांनी अशा गुन्ह्यांना पायबंद घालून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले. त्याला अनुसरून कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात सापळा रचून गस्त घालत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
गुप्त बातमीदारांकडून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांना आरोपी सहिमत शेखची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला बदलापूर शहर हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात त्याला अटक करुन पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आले. पोलीस कस्टडीत असताना त्याने एकूण सहा0 गुन्हे केल्याची कबूली दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड, घड्याळं असा एकूण चार लाख ५६,४३० रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती विजय खेडकर यांनी दिली.