खड्डे बुजवता, की स्वखर्चाने बुजवू; युवा सेनेकडून पालिकेला जाब

अंबरनाथ: दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून अंबरनाथच्या युवा सेनेने नगरपालिका प्रशासनाला खडसावले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवता की स्वखर्चाने आम्ही खड्डे बुजवू, असा सवाल विचारला आहे.

शहरात बहुतेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत, मात्र तरीही डांबरी रस्ते आणि काही ठिकाणी अंतर्गत रस्ते उखडले आहेत. त्यातच फॉरेस्ट नाका, मटका चौक, टी जंक्शन, मोरीवली एमआयडीसी, कल्याण-बदलापूर महामार्गावरील चिखलोली, लोकनगरी, रेल्वे स्थानकाजवळून कानसईकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे लवकर बुजवले नाहीत तर युवा सेनेच्या वतीने वाहतूक रोखून स्वखर्चाने खड्डे बुजवण्यात येतील. त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.

कल्याण, भिवंडी युवा सेनेचे निरीक्षक ॲड. निखिल वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा समन्वयक स्वप्नील जावीर, शहराध्यक्ष स्वप्नील भामरे, गणेश आयवळे, अमोल वाझे, देव यादव, वैभव शितोळे, वैभव डावरे, आकाश चलवादी आणि स्नेहल कांबळे आदींनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन खड्डे बुजवण्याची मागणी केली.