ठाणे : मुंब्रा पोलीस स्थानक ते माजिवडे गोल्डन डाईज नाका या मार्गावर ठाणे परिवहन सेवेची बससेवा सुरू झाल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी सभापती विलास जोशी आणि व्यवस्थापक यांना याबाबत पत्र दिले होते. घोडबंदर आणि मुंब्रा या मार्गावर रोज शेकडो नागरिक प्रवास करत असतात. परिवहन सेवेमुळे या प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार असून त्या माध्यमातून परिवहनचे उत्पन्नही वाढणार असल्याचे शमीम खान यांनी म्हटले आहे.
या मार्ग क्रमांक ४२ वरून रोज १२ फेऱ्या दोन्ही बाजूकडून होणार आहेत. गोल्डन डाईज नाका, माजिवडे येथून मुंब्रा पोलीस स्थानकाकडे सकाळी ७.०५ला पहिली बस निघणार असून शेवटची बस रात्री ८ वाजता निघेल. तर मुंब्रा येथून सकाळी ७.३५ ला पहिली बस निघणार असून शेवटची बस सायंकाळी ६.१५ला निघणार आहे.