ठाणे : सिडको येथून काल्हेरकडे जाणाऱ्या ठाणे परिवहन सेवेच्या बसचा सायलेन्सर गरम होऊन बसला किरकोळ आग लागली होती. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.
ठाणे परिवहन सेवेची बस दुपारी एकच्या दरम्यान २० ते २५ प्रवासी घेऊन काल्हेरच्या दिशेने जात असताना कळवा साकेत पूल येथे बसचा सायलेन्सर गरम होऊन किरकोळ आग लागली होती.
राबोडी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी या घटनेची माहिती जवाहरबाग अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या बसने २० ते २५ प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याची माहिती मिळताच वाहक, पोलिस आणि चालक यांनी प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. किरकोळ आग अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे विझवली.